दापोलीतील बीएसएनएल कार्यालयात चोरी

दापोली – शहरातील बीएसएनएल कार्यालयात घुसून जवळपास 9,950 रुपयांचा साहित्य ऐवज चोरीला गेल्याची घटना 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी ते 13 नोव्हेंबरच्या सकाळी दरम्यान घडली. या प्रकरणी गोपी रतन जाधव (23, रा. खेर्डी, खालची पेठ, चिपळूण) याच्याविरुद्ध दापोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

दूरसंचार अभियंता विजय राम मीना (35) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बीएसएनएल कार्यालयातील सी-डॉट एक्सचेंज कक्षाच्या भिंतीवरील एक्झॉस्ट फॅनच्या जागेतील होलचा वापर करून आरोपी जाधवने आत प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने कक्षात घुसलेल्या आरोपीने तेथील विविध साहित्यावर हात साफ केला.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 3,400 रुपये किंमतीची कॉपर एसी कुलंट पाईप, पिवळ्या व लाल रंगाच्या तांब्याच्या पाईपा, 500 रुपये किंमतीचा एसी फिल्टर एलिमिनेटर, 2,050 रुपये किंमतीचे अर्थिंग केबल, काळ्या–लाल–पिवळ्या रंगाच्या 2.5 मीटर केबली, तसेच 4,000 रुपये किंमतीचा रेक्टिफायर असा एकूण 9,950 रुपयांचा माल समाविष्ट आहे. दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 17-11-2025