Ratnagiri : जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांना आयएसओ प्रमाणपत्र

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व १९ पोलिस ठाणे, ४ उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय तसेच १ मोटर परिवहन विभाग, रत्नागिरी यांच्याकरता आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणित स्मार्ट पोलिस स्टेशन अंमलबजावणी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी १ जून २०१४ रोजी एसओएआर मॅनेजमेंट सर्विसेस अँड एसओएआर कॅन्सलटिंग सर्व्हिसेस, चिंचवड, पुणे यांना रत्नागिरी पोलिस दलाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावान्वये महाराष्ट्र पोलिस आणि भारत सरकार यांनी विहित केलेल्या महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी रोखणे आणि जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे व नागरिकांना विविध सेवा प्रदान करणे तसेच पोलिस विभागाची स्थापना, सर्व प्रकारची कागदपत्रे आणि आवश्यक पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे प्रशिक्षण
तसेच सबंध पोलिस विभागातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांची कार्यक्षमता, प्रयत्न आणि एक संघ म्हणून काम करण्याची इच्छा, अशा निकषांचा समावेश होता. या सर्व निकषांची व बाबींची एसओएआर मॅनेजमेंट सर्व्हिसेस अँड एसओएआर कॅन्सलटिंग सर्व्हिसेस, चिंचवड, पुणे यांच्या मार्फत ९० दिवसांत अवलोकर व पडताळणी करण्यात आली.

या सर्व निकषांच्या मूल्यांकनानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व १९ पोलिस ठाणे, ४ उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय तसेच १ मोटर परिवहन विभाग, रत्नागिरी यांना आयएसओ प्रमाणित स्मार्ट पोलिस स्टेशन मानांकन देण्यात आलेले आहे. ही मानांकन प्रमाणपत्रे शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते मासिक गुन्हे आढावा बैठकदरम्यान सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच मोटर परिवहन विभाग यांना देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 17/Nov/2025