ST BUS : आता एसटी चालक, वाहकांची ड्युटी रोटेशननुसार

रत्नागिरी : एसटी विभागातील विविध आगारांतील चालक-वाहक आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन सोयीची ड्युटी करीत होते. त्यामुळे इतर चालक-वाहकांवर अधिकचा भार पडत होता. त्यामुळे महामंडळास अनेक तक्रारी आल्यामुळे आता राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालक आणि वाहक यांना रोटेशन पद्धतीने ड्युटी करावी लागणार आहे. रोटेशन पद्धतीने चालक-वाहकांना ड्युटी द्यावी, असे परिपत्रक एसटी महामंडळाने काढले असून रत्नागिरी जिल्ह्यातील २ हजार ४४७ चालक वाहकांना रोटेशन पद्धतीने ड्युटी करावी लागणार आहे. त्यामुळे सोयीची ड्युटी करणाऱ्या चालक-वाहकांवर चाप बसणार आहे.

रोटेशननुसार चालक-वाहकांची ड्युटी लावण्याची पद्धत तशी जुनी आहे. मात्र, काही विभागातील आगारांत सोयीची ड्युटी देण्यात येत होती. एसटी विभागातील विविध आगारांतील चालक-वाहक ओळखीचा फायदा घेऊन सोयीची ड्युटी घेत होते. असा प्रकार वर्षानुवर्षे सुरुच होता. मात्र याचा इतर कर्मचाऱ्यांवर लांब पल्ल्याच्या ड्युटीचा ताण पडत होता. तसेच वादावादी होत होती. त्यामुळे एसटी महामंडळाकडे तक्रार गेल्यामुळे आता रोटेशनपद्धतीने ड्युटी लावावी, असे परिपत्रकच एसटी महामंडळाने राज्यातील सर्वच विभाग नियंत्रकांना दिले आहे.

….तर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
प्रत्येक आगारात चालक आणि वाहकांना ड्युटीचे वाटप करताना कोणालाही सोयीची ड्युटी देण्यात येणार नसून रोटेशन पद्धतीने ड्युटी सुरू होणार आहे. याची तंतोतंत अंमलबजावणी करावी, असा आदेश देण्यात आला आहे. याकडे दुर्लक्ष केल्यावर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ही देण्यात आला आहे.

रत्नागिरी विभागात रोटेशन पद्धतीने ड्युटी लावण्यात येते. रोटेशन पद्धतीने ड्युटी लावा, असे परिपत्रक एसटी महामंडळाने पाठवले आहे. आदेशानुसार प्रत्येक चालक-वाहकाची ड्युटी रोटेशननुसार लावली जाणार- प्रज्ञेश बोरसे,विभागीय नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 17/Nov/2025