चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची अक्षरशः झुंबड उडाली. महायुतीतर्फे शिंदे सेनेचे उमेश सकपाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे मिलिंद कापडी मांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी एकूण १३ उमेदवारांनी अर्ज भरले असून नगरसेवक पदासाठी एकूण १५४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत राजकीय पक्षांची घासाघीस सुरू राहाणार आहे. यामध्ये महायुती व आघाडीला यश मिळाले तर उमेदवारांची संख्या कमी होईल; अन्यथा चिपळूणमध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळेल.
चिपळूण न.प. च्या २८ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. अखेरच्या दिवशी तब्बल ९३ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. महायुतीचे उमेश सकपाळ यांनी वाजतगाजत कार्यकर्त्यासह शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण देखील उपस्थित होते. अद्याप महायुतीचे गणित जुळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे मिलिंद कापडी यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीकडून अनेक उमेदवारांनी (सोमवारी) अर्ज दाखल केले. भाजपने मात्र नमती भूमिका घेत नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखलच केला नाही. भाजपच्यावतीने १२ उमेदवारी अर्ज तर शिंदे सेनेला १६ जागा सोडण्यात आल्या व त्या उमेदवारांनी अर्जदेखील दाखल केले.
मात्र, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला महायुतीत जागांचे स्थान दिले नसल्याने शिंदे सेना व भाजपची युती झाल्याची चर्चा परिसरात रंगली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने देखील जास्तीत जास्त प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसच्या वतीने देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सुधीर शिंदे यांनी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या शिवाय प्रत्येक प्रभागातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप आणि शिंदे शिवसेनेमधील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे प्रांताधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत मोठी गर्दी पाहायला मिळाली.
काँग्रेसने देखील शेवटपर्यंत जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, तालुकाध्यक्ष लियाकत शाह, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जयेंद्रथ खताते, मिलींद कापडी, आदिती देशपांडे तर शिंदे सेनेचे पदाधिकारी, भाजपचे नेते प्रशांत यादव उपस्थित होते. यावेळी भाजपचा राजीनामा दिलेले परिमल भोसले यांनीदेखील बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुपारी ३ वा. पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी १३ तर २८ नगरसेवक पदासाठी १४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 18/Nov/2025














