संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शेवटच्या दिवशी अधिक वेगवान झाली. इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कार्यालयात पाहायला मिळाली. या निवडणुकीत तिरंगी वा चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसत आहे.
देवरूख नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपद व १७ प्रभागासाठी एकूण ८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. कागदपत्रांची पूर्तता, आवश्यक प्रतिज्ञापत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक निवडणूक कार्यालयात मोठ्या संख्येने दिसत होते.
आजपर्यंत दाखल झालेल्या अर्जामध्ये नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदांसाठी चुरस वाढली आहे. अनेक प्रभागांत बहुरंगी लढती होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मतविभाजनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध पक्षीय नेत्यांमध्ये रणनीती ठरवण्यासाठी बैठका सुरू आहेत.
अपक्षांना थांबवणार की ?
नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये भाजप, शिवसेना ठाकरे गट, आप तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. नगरसेवकपदांसाठी विविध पक्षांच्या गटागटांतील कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीत काहींनी अपक्ष अर्ज दाखल केले असल्याने या प्रभागातील बंडखोरी रोखण्यासाठी वरिष्ठ ठोस पावले उचलणार की, आतून छुपा पाठिंबा देणार याकडे देवरूख शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 18/Nov/2025














