मंडणगड : तालुक्यातील वेरल आणि पालवनी या गावांमध्ये NYCC आणि ट्रीपल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेती आणि बांबू आधारित वनशेतीवरील एक दिवसीय हरित कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन १४ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले. या उपक्रमाला YFN इंडिया फाउंडेशन तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेत वाढत्या शेतीखर्चाचा गंभीर मुद्दा, कोकणासाठी उपयुक्त ठरणारी बांबू आधारित वनशेती आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेतकरी उत्पादक संघ, स्वयंसहायता गट आणि विविध क्षेत्रातील युवा व अनुभवी शेतकरी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. कोकणात वाढत्या स्थलांतरामुळे अनेक गावे वृद्ध आणि युवा महिलांवर अवलंबून राहिली आहेत. स्थिर उपजीविकेच्या संधींचा अभाव ही मोठी समस्या असल्याने, नैसर्गिक शेती आणि बांबू आधारित वनशेती हे शाश्वत रोजगारनिर्मितीसाठी प्रभावी मार्ग ठरू शकतात, असा निष्कर्ष कार्यशाळेत नोंदवण्यात आला. कोकणातील हवामान, मातीची गुणवत्ता आणि बाजारपेठेतील वाढती मागणी लक्षात घेता बांबू लागवड ही भविष्यकालीन फायदेशीर गुंतवणूक ठरू शकते, यावरही मत एकवटले.
या कार्यशाळेनंतर पुढील उपक्रमांची दिशा निश्चित करण्यात आली. डिसेंबर महिन्यात माती परीक्षण मेळावा तसेच बांबू लागवडीसाठी भूमी सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच वडवली (मंडणगड) येथील भावेश कारेकर यांच्या ‘बांबू व्हिलेज इंडिया’ प्रकल्पाला शेतकरी सहलीचे आयोजन करून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवून देण्याची योजना आखण्यात आली आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी NYCC चे क्लायमेट चॅम्पियन शुभम गुरव, ट्रीपल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक भावेश कारेकर आणि सहकारी संगीत बने, भरारी उद्योगजिका गटाच्या अध्यक्षा किमया जोशी, YFN इंडिया फाउंडेशनचे अक्षय लोहार तसेच कृषि विभागातील स्नेहल सतीश गुजर आणि नेहा निलेश रासळ (कृषी सखी) यांनी विशेष योगदान दिले. कोकणातील शेतकरी शाश्वत शेतीकडे वळण्यासाठी आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरेल, अशी अपेक्षा सहभागी संस्था आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 18/Nov/2025














