प्रभाग ५ मधून ‘महायुती’च्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ! विकासकामांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : आगामी रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने जोरदार तयारी सुरू केली असून, प्रभाग ५ मधून त्यांच्या प्रचाराचा आकर्षक आणि लक्षवेधी शुभारंभ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रभागाने महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ शिल्पा सुर्वे यांना दोन टर्म नगरसेवक म्हणून नेतृत्वाची संधी दिली, त्याच प्रभागातून प्रचाराचा शंखनाद करण्यात आला.

‘नाचणे देवी मंदिरातून’ प्रचाराचा श्रीगणेशा : नवा उत्साह, नवा संकल्प
प्रभाग ५ मधील महायुतीचे नगरसेवकपदाचे उमेदवार सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ नाचणे येथील ऐतिहासिक नवलाई मंदिरात करण्यात आला. प्रचाराचा धार्मिक पद्धतीने श्रीगणेशा करत, नवलाई देवीच्या चरणी श्रीफळ आणि महायुतीचा जाहीरनामा ठेवून हा सोहळा पार पडला.

विकासकामांना नागरिकांची ‘पोचपावती’
या शुभारंभ सोहळ्याला प्रभाग ५ मधील दोनशेहून अधिक नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. शुभारंभाला जमलेली ही अभूतपूर्व गर्दी म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महायुतीचे प्रमुख नेते श्री. उदय सामंत यांनी या प्रभागात केलेल्या भरघोस विकासकामांना मिळालेली जणू पोचपावतीच ठरली.

महायुतीच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधत, प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती
प्रचाराच्या या पहिल्याच दिवशी शिवसेना आणि भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी यांची लक्षणीय उपस्थिती होती. या सर्वांनी दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देत, महायुतीच्या विजयासाठी एकजूट दाखवली. या एकजुटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेकॉर्ड ब्रेक मतदानाची अपेक्षा
उपस्थित नागरिकांचा उत्साह, पालकमंत्री उदय सामंत यांच्या विकासकामांवरील नागरिकांचा विश्वास आणि शिल्पा सुर्वे यांच्या मागील नेतृत्वाचा आधार पाहता, प्रभाग ५ मधून महायुतीला ‘रेकॉर्ड ब्रेक’ मतदान होईल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. हा प्रभाग महायुतीला मोठा विजय मिळवून देण्यास सज्ज असल्याचे चित्र आहे.