चिपळूण : गाणे-खडपोली एमआयडीसीमधील साफ यिस्ट कंपनीविरोधात गेले तीन दिवस सुरू असलेले कामगारांचे उपोषण अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आ. शेखर निकम यांनी केलेल्या चर्चेनंतर सोडण्यात आले. २०० कामगारांना तातडीने कामावर रुजू करून घेण्यास कंपनीने संमती दिली व उर्वरित कामगारांना लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही आ. शेखर निकम यांनी दिली. यानंतर उपोषणाला बसलेल्या कामगारांनी सरबत पिऊन उपोषण सोडले.
गेले तीन दिवस कंपनीविरोधात हा लढा सुरू होता. येथील २३० कामगारांना कंपनीने कामावरून काढले होते. अनेक वर्षे कामावर असलेले लोक यामुळे रस्त्यावर आले होते व त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. सलग तीन दिवस कुटुंबासह हे कामगार संघर्ष करीत होते. त्याला दसपटीतील ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला होता. महिला कामगारांनीही कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला होता. या प्रकरणी कामगार आयुक्तांना देखील कामगारांनी धारेवर धरले होते. अखेर आज (मंगळवारी) सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महामुनी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या आंदोलन संदर्भात आ. शेखर निकम सातत्याने साफ यिस्ट कंपनी प्रशासनाशी बोलणी करीत होते. त्यानुसार आ. निकम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अधिकारी व व्यवस्थापनाशी संयुक्त चर्चा होऊन २०० कामगारांना त्वरित कामावर घेऊन उर्वरित कामगारांना मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करून सामावून घेतले जाईल, असे आश्वासन आ. शेखर निकम यांनी दिले.
यावेळी आ. निकम यांनी या कामगारांना आपण एकाकी टाकणार नाही. त्यांना कामावर रुजू करण्याची जबाबदारी घेऊ, असा शब्द दिला. याचा मान राखत उपोषणकर्त्यांनी सामंजस्याने हे उपोषण थांबविले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, दशरथ दाभोळकर, माजी जि. प. सदस्य विनोद झगडे, अॅड. अमित कदम, रेश्मा पवार, स्वप्नील शिंदे, प्रकाश पवार, निलेश कदम, शिल्पा शिंदे, शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत पाटील, पंचक्रोशितील ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 19/Nov/2025














