Khed Jagbudi River : जगबुडीतील गाळ उपशासाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा…

खेड : शहरातील जगबुडी तसेच नारिंगी नदीपात्रातील गाळ उपसा केल्यामुळे यंदा खेड शहरावर घोंगावणारा पुराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. नदीकाठच्या रहिवाशांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना याचा दिलासा मिळाला. जगबुडी नदीपात्रातून १२ हजार ५४९ ब्रास म्हणजेच ३५ हजार ५१४ घनमीटर गाळ उपसण्यात आला आहे; मात्र उर्वरित गाळ उपशासाठी वरिष्ठांकडून अधिकृत आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याची माहिती प्रशासनातून मिळाली आहे. आदेश मिळाल्यानंतरच पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरात शिरत होते. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते होते. त्यामुळे जगबुडी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पाठपुरावा केला. गाळ काढल्यामुळे पुराचे संकट कमी होईल, असा उपाय सुचवण्यात आला होता.

मंत्री कदम यांच्या प्रयत्नामुळे गाळ काढण्यासाठी २ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर गेले दोन वर्षे पावसाळ्यापूर्वी गाळ उपसण्याचे काम सातत्याने राबवले जात आहे. गतवर्षी दोन पोकलेन मशिनच्या मदतीने गाळ उपसा वेगाने करण्यात आला. सलग तीन महिने कार्यकारी अभियंता गणेश सलगर, उपविभागीय अधिकारी सत्यजित गोसावी, कनिष्ठ अभियंता हेमंत ढवण, बलवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १३ जूनपर्यंत कामकाज सुरू होते. उपसलेल्या गाळामुळे यंदा पुराचा धोका कमी झाला. बाजारपेठेत केवळ एकदाच पाणी शिरले होते. अन्यवेळी केवळ पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नुकसानीपासून व्यापाऱ्यांची सुटका झाली. गाळ उपशासाठी मंजूर निधीपैकी काही रक्कम अजूनही शिल्लक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 19/Nov/2025