रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार श्रीमती शिल्पा सुर्वे यांनी आपल्या ‘होम पीच’ म्हणजेच ज्या प्रभागाचे त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले, त्याच प्रभाग ५ मधून प्रचाराची दमदार सुरुवात केली आहे. या शुभांरभ सोहळ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावत शिल्पा सुर्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
नाचणे नवलाई मंदिरातून प्रचाराचा श्रीगणेशा
शिल्पा सुर्वे यांनी प्रचाराला प्रारंभ करण्यासाठी नाचणे येथील पवित्र नवलाई देवीच्या मंदिराची निवड केली. देवीला श्रीफळ अर्पण करून आणि आशीर्वाद घेऊन प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. शिल्पा सुर्वे यांचा नम्र स्वभाव, सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची पद्धत आणि त्यांच्या कामातील पारदर्शक व स्पष्ट भूमिका, यामुळे त्या बहुसंख्य नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. याच कारणामुळे त्यांच्या प्रचाराच्या पहिल्याच सभेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
महिलांचा लक्षणीय सहभाग आणि ‘दोन टर्म’चा अनुभव
ज्या प्रभाग ५ मधून प्रचाराची सुरुवात करण्यात आली, तेथे शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. विशेष म्हणजे, या गर्दीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. महिलांच्या या सक्रिय सहभागातून शिल्पा सुर्वे यांच्या कामाची पद्धत महिला वर्गाला किती भावली आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. शिल्पा सुर्वे यांच्या पाठीशी नगरसेवक म्हणून तब्बल दोन टर्मचा प्रदीर्घ आणि यशस्वी अनुभव आहे. रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार चालवण्यासाठी आणि शहराला योग्य दिशा देण्यासाठी हा प्रशासकीय अनुभव अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
संपूर्ण शहरात शिल्पा सुर्वे यांच्या नावाची चर्चा
निवडणुकीच्या या रणधुमाळीत रत्नागिरी शहरातील प्रत्येक नागरिकाच्या तोंडी आज नगराध्यक्ष म्हणून शिल्पा सुर्वे यांचेच नाव चर्चेत आहे. अनुभव, विकासनिष्ठा आणि नम्र नेतृत्व या त्रिसूत्रीमुळे त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. महायुतीच्या या प्रचाराच्या दणक्यामुळे, आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिल्पा सुर्वे यांचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.














