Leprosy case detection campaign : जिल्ह्यात २ डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग शोध मोहीम

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये सोमवारपासून (ता. १७) कुष्ठरोग शोध मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम २ डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. यासाठी १ हजार १५३ शोधपथके तयार करण्यात आली आहेत. आरोग्यपथके घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार असून, त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

कुष्ठरोग शोधमोहीम २०२५ जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, आरोग्यसेवा (कुष्ठरोग) चे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेझ पटेल, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे आदी उपस्थित होते. डॉ. आठल्ये आणि डॉ. पटेल यांनी संगणकीय सादरीकरण करून मोहिमेबाबत माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, या मोहिमेची जनजागृती करा. जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी अर्थात् शून्य कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग काम करत आहे. या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या आरोग्यपथकास सहकार्य करून स्वतःची तपासणी करून घ्यावी. या पंधरवड्यात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करणार आहेत. यासाठी १ हजार १५३ शोधपथके तयार करण्यात आली आहेत. २३६ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक पथकात एक आशा व एक पुरुष स्वयंसेवक असणार आहे. जिल्ह्यातील जोखीमग्रस्त व दुर्लक्षित भागांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये कुष्ठरोग लक्षणांची ओळख व वेळेवर उपचार देणे, प्रसार रोखणे व सामाजिक भेदभाव दूर करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

दरम्यान, जनजागृतीसाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा तसेच कुष्ठरोगाची चिन्हे, लक्षणे, मोफत उपचार आणि समज-गैरसमज याबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. गावपातळीवर दवंडी देऊन सर्व ग्रामस्थांना अभियानाची माहितीही दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 19/Nov/2025