Khed : भरधाव कारची धडक बसून रिक्षाचालकाचा मृत्यू

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील पिरलोटे येथील ओव्हरब्रिजजवळ मंगळवारी (दि. १८) सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्विफ्ट कार चालकावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत रिक्षाचालक अल्ताफ हसन ठाकूर (वय ४७, रा. असगणी मोहल्ला, खेड) हे सकाळी रिक्षाने लोटे बाजूने प्रवास करत होते. दरम्यान, पिरलोटे ओव्हरब्रिजच्या वरच्या बाजूस आल्यानंतर चंदेरी रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने येत त्यांच्या लेनमध्ये घुसली. चालक पुनित मधुकर नायक (३९, रा. पिरलोटे) याने निष्काळजीपणे कार चालवित रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षा उलटून रस्त्याच्या उजव्या बाजूस घसरत पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकली. रिक्षाखाली अडकलेल्या अल्ताफ ठाकूर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणी लोटे येथील उपनिरीक्षक यांनी आरोपी कारचालक पुनित नायक याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. खेड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 20/Nov/2025