Dapoli : पांगारी मार्गावरील रस्त्याची कडा धोकादायक

दापोली : उर्फी गावानजीक पांगारी या मुख्य मार्गावर रस्त्याची कडा सतत निखळत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठे संकट ओढवले आहे. गेल्या काही दिवसांत या रस्त्याची कडा मोठ्याप्रमाणात खचू लागल्याने वाहनधारकांना अतिशय धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे.

याठिकाणी आधीच अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. रस्त्याची कडा खोल उताराला लागून असल्यामुळे थोडीही चूक झाली तरी दुचाकी किंवा चारचाकी वाहन रस्त्याबाहेर घसरू शकते. त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणे वाहनचालकांसाठी आव्हान ठरत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला अनेकदा रस्त्याच्या कडेला संरक्षणभिंत उभारण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप ठोस पावले न उचलल्याने नागरिक नाराज आहेत. कडा दिवसेंदिवस खाली सरकत आहे. संरक्षण भिंत नसल्यामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती आहे.

या महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याची कडा स्थिर करण्यासाठी संरक्षण भिंत उभारावी, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

हा पर्यटन मार्ग असल्यामुळे पन्हाळेकाझी येथील लेणी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या मार्गावरून प्रवास करतात. रस्त्याची अशी धोकादायक स्थिती कायम राहिल्यास कधीही गंभीर अपघात घडू शकतो-रमाकांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, देगाव-दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 20/Nov/2025