खेड : नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी मोठी धावपळ झाली, नगरसेवक पदासाठी तब्बल ४८ उमेदवारी अर्ज भरले गेले असून एकूण अर्जाची संख्या ८२वर पोहोचली होती, तर नगराध्यक्षपदासाठी ८ जणांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी मंगळवारी १८ रोजी छाननीदरम्यान २१ अर्ज अवैध, तर ६९ अर्ज वैध ठरले आहेत. २१ नोव्हेंबर ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतरच प्रत्यक्ष लढती स्पष्ट होणार आहेत, २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. खेडमध्ये यंदा शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी(अजित पवार) महायुती आणि उबाठा, राष्ट्रवादी (शरद पवार), मनसे, महाविकास आघाडी यांच्यात सरळ सामना पाहायला मिळणार आहे.
शिवाय १५ अपक्ष उमेदवारांनीही रिंगण गाठले असून ते कोणाच्या मतांमध्ये खिंडार पाडणार, याकडेही लक्ष वेधले गेले आहे. महालढाईत महायुतीकडून शिवसेनेच्या माधवी बुटाला यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे, तर महाविकास आघाडीकडून सपना कानडे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. महाविकास आघाडीने शेवटपर्यंत आपली उमेदवार यादी गोपनीय ठेवत वातावरणात चुरस निर्माण केली होती. त्यांच्या उशिरा झालेल्या घोषणेमुळे महायुतीलाही अनपेक्षित धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात जोरदारपणे चर्चेत आहे.
याशिवाय नगराध्यक्षपदासाठी वैभवी खेडेकर (अपक्ष), तेजल चिखले (शिवसेना), सीमा जाधव (वंचित बहुजन आघाडी), कौसर मुजावर (उबाठा) तसेच माधवी बुटाला (शिवसेना) असे अर्जही दाखल झाले आहेत.
आता सर्वांचे लक्ष २१ नोव्हेंबरकडे
एकूण ९० अर्जांपैकी २१ अवैध ठरल्याने सध्या ६१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, २१ नोव्हेंबरला उमेदवारी मागे घेण्याचा दिवस असल्याने कोण कोण माघार घेतात याकडे खेडकरांचे लक्ष लागले आहे. पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरांची भूमिका आणि अपक्षांची रणनीती यामुळे निवडणुकीची रंगत अधिक वाढणार आहे. खेड नगरपरिषद निवडणूक यंदा अभूतपूर्व चुरशीची होण्याची चिन्हे असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रंगणारी भेट लढत खेड शहराच्या राजकारणाला नव्या वळणाला नेणारी ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 20/Nov/2025














