चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण आयोजित चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ३० नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. विविध राज्यांतून आणि रत्नागिरी जिल्ह्यातून तसेच शालेय गटातील स्पर्धेसाठी अनेक धावपटूंनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमधून या स्पर्धेसाठी २१ किलोमीटर आणि १० किलोमीटरसाठी सुमारे २५० स्पर्धकांनी आपली नोंदणी केलेली आहे. तसेच शालेय गटात ५ कि.मी. साठी सुमारे १ हजार २०० स्पर्धक सहभागी होतील, असे सांगण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत, प्रसाद देवस्थळी, संध्या दाभोळकर यांची ब्रँड अॅम्बेसिडर, तर या स्पर्धेला कॅप्टन म्हणून डॉ. मनीषा वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्पर्धेत वयानुसार महिला व पुरुष असे पाच गट करण्यात आले आहेत. पुरुष व महिला गटातील विजेत्यास ५१ हजार रूपये पारितोषीक ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत एकूण ६ लाख २८ हजारांची बक्षिसे आहेत.
२१ कि.मी. पुरुष व महिला गटात ओपन गट, ३१ ते ४० वर्षे, ४१ ते ५०, ५१ ते ६० आणि ६० वर्षांवरील असे गट आहेत. तसेच १० किलोमीटर व ५ किलोमीटर करिता हीच वयोमर्यादा आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी वय वर्ष १४, १५, १६ आणि १७ हे गट करण्यात आले आहेत. नावनोंदणीसाठी WWW.run Chiplun.in या वेवसाईटवर रजिस्ट्रेशन दि. २२ नोव्हेंबर सायंकाळी ६ वा. पर्यंत करावे. स्पर्धेसाठी सह्याद्री निसर्ग मित्र संस्था थीम पार्टनर आहे. सहभागी स्पर्धकांनी बीप घेताना १०० ग्राम प्लास्टिक जमा करावयाचे आहे. त्याचे त्यांना कुपन देण्यात येईल आणि लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 20/Nov/2025














