लांजा : महायुतीच्या माध्यमातून शिवसेना-भाजप एकत्र आलेले असतानाच लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे माजी नगरसेवक, जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांच्या पत्नी प्रियंका यादव यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे प्रस्थापितांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
माघारीनंतरही त्या रिंगणात राहिल्या तर ही लढत तिरंगी होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
लांजा नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीपासूनच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा निर्धार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांनी केला होता. नगराध्यक्ष पदासह सन्मानजनक नगरसेवक पदे न मिळाल्यास प्रसंगी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार लांजा शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे शिवसेना- भाजप महायुती होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते. मात्र अखेरच्या टप्प्यात शिवसेना-भाजप युती होऊन भाजपला १७ पैकी एक नगरसेवक देवून त्यांची बोळवण करण्यात आली. मागील वेळी नगरपंचायतीमध्ये भाजपचे तीन नगरसेवक असताना यावेळी केवळ एकमेव जागा भाजपच्या वाट्याला सोडण्यात आली आहे. सन्मानजनक जागा न मिळाल्यामुळे अखेर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर, अपक्षपणे निवडणुकीला सामोरे जाता निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर एक मोठे आव्हान उभे निर्माण केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 20-11-2025














