मंडणगड : मंडणगड तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पंचायत समिती आरोग्य विभाग आणि वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्याची सुरुवात १८ नोव्हेंबरपासून झाली असून, आतापर्यंत १०७ जणांनी तपासणी केली. हा उपक्रम २२ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथे मोफत तपासणी आरोग्य शिबिरांचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) मल्लिनाथ कांबळे, तसेच प्रकल्प अधिकारी (कर्करोग) ऑनलाईन उपस्थित होते. तसेच गटविकास अधिकारी सुनील खरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे व स्थानिक अधिकारी कार्यक्रमावेळी उपस्थित होते. देव्हारे येथे झालेल्या पहिल्या शिबिरात १०७ नागरिकांनी कर्करोग तपासणीचा लाभ घेतला. यामध्ये महिलांनीही गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी करून घेतली. म्हाप्रळ येथे बुधवारी (ता. १९) शिबिर झाले. यावेळीही ग्रामस्थ सहभागी झालेले होते. कुंबळे येथे (ता. २०) तर २१ नोव्हेंबर रोजी मंडणगड पंचायत समितीत, २२ नोव्हेंबर रोजी पणदेरीत दुपारी ११ ते २ या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांनी नागरिकांनी, विशेषतः महिलांनी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
जागरुकता वाढवण्यावर भर
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचाराची संधी उपलब्ध करून देणे आणि कर्करोगाबाबत जागरुकता वाढवणे हा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार गावोगाव आरोग्य विभागाची यंत्रणा फिरत आहे. प्राथमिक स्तरावर कर्करोगाचे निदान झाले, तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. त्यामुळे याचा लाभ घ्यावा, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 20/Nov/2025














