Ratnagiri ST BUS : सहलीसाठी ३५० एसटी गाड्यांचे बुकिंग हाऊसफुल्ल

रत्नागिरी : जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलीसाठी परिवहन मंडळाच्या एसटी बसेसना मोठी पसंती मिळत आहे. सहलीसाठी रत्नागिरी विभागातून नोव्हेंबर महिन्यासाठी २००, डिसेंबर महिन्यासाठी आतापर्यंत १५० असे एकूण ३५० एसटी बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असून, सहलीसाठी परिवहन मंडळाच्या बस सुसाट धावत आहेत. ९ आगारातून दररोज १८ हन अधिक बसेस विविध मार्गावर धावत आहेत.

नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने शाळा, महाविद्यालयांच्या सहलीचे महिने असतात. शैक्षणिक सहलीस प्रारंभ झालेले आहे. सुरक्षित व चांगला प्रवास होण्यासाठी शाळा, महाविद्यालयांची पहिली पसंती खासगी बसेसाऐवजी लालपरीलाच आहे. कारण विशेषतहा सहलीसाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध आगारात काही महिन्यापूर्वीच नवीन स्मार्ट बसेस आलेल्या आहेत. या बसेस तसेच विविध चांगल्या बसेस सहलीला दिल्या जात आहेत. सद्यस्थितीत रत्नागिरी विभागातून १८ बसेस सहलींसाठी विविध मार्गावर धावत आहेत. नोव्हेंबर महिन्यात २०० बसेस तर डिसेंबर महिन्यासाठी १५० बसेसचे बुकिंग झाले असून, आणखी शेवटच्या टप्प्यात, जानेवारीच्या महिन्यातही बसेसचे बुकिंग वाढण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक सहलीसाठी परिवहन विभागाच्या बसेसना मागणी वाढली आहे. सहलीसाठी नव्या बस उपलब्ध करून दिल्या जात आहे. आतापर्यंत ३५० बसेसचे बुकिंग झालेले आहे. आणखी बुकिंग वाढण्याची शक्यता आहे. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी परिवहनच्या बसेसना प्राधान्य दिले जाते. सर्व शाळांना मागणीनुसार बस उपलब्ध केल्या जात आहेत- प्रज्ञेश बोरसे, विभागीय नियंत्रक, रत्नागिरी

कोकणात सहलीस सुरुवात
दरवर्षी दिवाळी, दसरा सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांना सहलीचे वेध लागतात. परिवहन महामंडळाने विद्यालयांना शालेय सहलीसाठी एकूण भाड्यामध्ये सवलत दिली आहे. यामुळे कोकणातील गणपतीपुळे, रत्नागिरी शहर, किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, वस्तूसंग्रहालय यासह विद्यार्थ्यांना कमी दरात राज्य आणि परराज्यातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेट देता येऊ लागली आहे.

उत्पन्नात वाढ होणार
शैक्षणिक सहलीसाठी विविध मार्गावर बसच्या माध्यमातून मंडळाला अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होणार आहे. सध्या १८ हुन अधिक बसेस विविध मार्गावर धावत आहेत. त्यामुळे सहलींच्या माध्यमातून महसूल जमा होऊ लागला आहे. कोट्यवधीचे उत्पन्न या सहलीतून रत्नागिरी विभागाच्या एसटी विभागास मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 21-Nov-2025