Sangameshwar : विद्युत तारेमुळे दोन रानकुत्र्यांचा मृत्यू

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील मौजे कोंडीवरे येथे साबुदाणा बागेच्या कंपाऊंडला जोडलेल्या बेकायदेशीर विद्युत तारेचा धक्का लागून दोन रानकुत्र्यांचा (कोळसुंदे) मृत्यू झाल्याची घटना (ता. १९) उघडकीस आली. या प्रकरणी वन विभागाने दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले.

तेथे मृत रानकुत्रे जागेवर आढळले नाहीत. मात्र चौकशीअंती बागेची देखरेख करणाऱ्यांनी मृत प्राणी बागेतच खड्डा खणून पुरल्याचे कबूल केले. तो खड्डा उकरून एक नर व एक मादी अशा दोन रानकुत्र्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात जॉर्ज पी. व्ही. (मूळ गाव कन्नूर, केरळ) आणि घनश्याम (मूळ गाव लखीमपूर, उत्तर प्रदेश) या दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. शेती संरक्षणासाठी वापरलेली विद्युत तार, झटका मशीन, बॅटरी, वायर, चिमटा वायर आणि फावडा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेटे, डॉ. बेलुरे आणि डॉ. सोनाली शेटे यांनी तपासणी करून मृत प्राण्यांचे शवविच्छेदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 21-Nov-2025