गुहागर : श्रावण महिन्याच्या अखेरीस निसर्ग आपले रंग उधळून कूस बदलून निघून जातो. त्यानंतर पावसाने तृप्त झालेल्या भूमीत ऐन थंडीत रानफुलांचा बहर चोहीकडे दिसू लागतो. ओढे, डोंगर, रानशिवार फुलांनी सजू लागतात. या रानफुलांच्या गर्दीत जे फूल आपले वेगळेपण ठसवते ते म्हणजे कुरडू होय.
हिरव्या गवताच्या जाळ्यांतून उमललेली कुरडूची फुले म्हणजे जणू निसर्गान उधळलेली मोत्यांची उधळणच! या फुलांना गंध नसला तरी त्यांचा टिकाऊपणा आणि स्थैर्य हेच त्यांच्या सौंदर्याचे गुपित आहे. कार्तिक महिन्याच्या अखेरीपर्यंत आपला बहर टिकवून ठेवणाऱ्या या फुलांची नाजूक नसलेली, पण दीर्घायुषी रचना निसर्गाच्या कुशल कारागिरीचे उदाहरण आहे.
धार्मिक महत्त्व लाभलेले फूल
कुरडूचे फूल केवळ सौंदर्यापुरते मर्यादित नाही. त्याचा टिकाऊपणा इतका विलक्षण आहे की, त्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नवान्न पौर्णिमला घराघरात बांधल्या जाणाऱ्या नव्यात कुरडूच्या फुलाला खास स्थान असते. ही फुले सहज न कोमेजणारी असल्याने ती श्रद्धेचे प्रतीक मानली जातात. स्पर्श केला असता ती कृत्रिम भासतात, पण तोच त्यांचा निसर्गदत्त कवच असतो मोत्यासारखी शुभ्र, नंतर हलक्या जांभळट छटा धारण करणारी ही फुले मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करतात. गंध नसतानाही त्यांचा मोह या जीवांना आवरता येत नाही.
शिवारात फुललेले निसर्गाचे गालिचे
पावसाळ्यात शेतांच्या बांधांवर आणि मोकळ्या शिवारात कुरडू मोठ्या प्रमाणावर उगवतो. साधारण गवतासोबतच वाढणारे हे रोप फुलू लागले की त्याचे सौंदर्य दूरूनच उठून दिसते.
पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली की अनेक रानफुले अंतर्धान पावतात, मात्र कुरडूचा बहर कार्तिकापर्यंत टिकतो. टिकाऊपणाचे हेच त्याचे गुपित सामर्थ्य आहे. सध्या कोकणा हिरव्या जाळ्यांवर कुरडूच्या शुभ्र-जांभळ्या फुलांनी सजलेले शिवार म्हणजे जणू निसगनि घातलेला रंगीत गालिचाच! या फुलांनी निसर्ग अधिक उजळून गेला आहे.
निसर्गाचा टिकाऊ अलंकार
कुरडू हे फक्त रानफूल नाही, तर निसर्गाचा टिकाऊ अलंकार आहे. अल्पायुषी रानफुलांच्या गर्दीत दीर्घकाळ बहर टिकवून ठेवणारे हे फूल स्थैर्य आणि सहनशीलतेचा संदेश देते. निसर्गाच्या या चमत्कारिक निर्मितीकडे पाहताना असं वाटतं की, सौंदर्य नेहमी नाजूकच असावं असं नाही; कधी कधी टिकाऊपणातही ते अधिक खुलतं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:49 PM 21-Nov-2025














