General Election 2025 : राजापुरात नगराध्यक्षपदाचा एक अर्ज मागे

राजापूर : येथील पालिका निवडणुकीसाठी वैध ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, निवडणूक आखाड्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज वगळता अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे राजापूर नगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा सरळ दुरंगी होत असलेल्या लढतीमध्ये अपक्षांच्या आव्हानामुळे ‘ट्विस्ट’ निर्माण झाले आहे.

नगराध्यक्षपदाच्या रिंगणातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शीतल पटेल यांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आता महाविकास आघाडीच्या अॅड.हुस्नबानू खलिफे, महायुतीच्या श्रुती ताम्हणकर आणि अपक्ष ज्योती खटावकर अशी तिरंगी लढत होणार आहे. नगरसेवकपदासाठी वैध ठरलेले सात उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले असून, आता दहा प्रभागातील २० जागांसाठी तब्बल ५१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत

नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी शाहबाज खलिफे प्रभाग-१ (ब), सोनल केळकर यांनी प्रभाग २ (ब), आदित्य बाकाळकर, संजय पवार, सुशांत पवार यांनी प्रभाग-४ (ब), आदिल ठाकूर यांनी प्रभाग-७ (ब), माजी नगराध्यक्ष कल्याणी रहाटे यांनी प्रभाग-१० (ब) अशा सातजणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नगरसेवकपदाच्या वीस जागांसाठी होत असलेल्या लढतीसाठी ५१ उमेदवार रिंगणात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 22-Nov-2025