रत्नागिरी : जिल्हा प्रशासन, पोलीस आणि उद्योग क्षेत्राचा सौदार्हपूर्ण समन्वय होण्यासाठी सीमाशुल्क विभागाने आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे. पुणे कस्टम्स युनिटी कप स्पर्धा २२ व २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये कस्टम्स पुणे, जीएसटी पुणे, जिल्हा पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय, जेएसडब्ल्यू आणि फिनोलेक्स इंडस्ट्रिजचे संघ खेळणार असल्याचे सीमाशुल्क तथा केंद्रीय उत्पादक शुल्कचे सहायक आयुक्त संदीप कृष्ण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्रीय व राज्य विभागांसह उद्योग क्षेत्रातील सुसंवाद वाढून परस्पर सहकार्य वाढावे यासाठी अधीक्षक अतुल गायकवाड आणि लक्ष्मीकांत भाटकर यांनी या क्रिकेट स्पर्धेची कल्पना प्रत्यक्षात उतरवली असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. या स्पर्धेत ६ संघ सहभागी होणार आहे. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ८ षटकांची असणार असून, स्पर्धेचे उद्घाटन पुणे कस्टम्सचे आयुक्त डी. अनिल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जीएसटी विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, जेएसडब्ल्यू पोर्ट, फिनोलेक्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून सहभागी होणाऱ्या क्रिकेट संघाचे मनोबल वाढवणार आहेत.
शासकीय सेवांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गामध्ये दुरावा असतो. परस्पर सहकार्याची अडचण असते. अशावेळी नियमित सरकारी कामकाजासह सहकार्य वाढून एकसंघपणा यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून परस्पर मैत्री आणि एकमेकांना सहकार्य करण्याची भावना वाढीस लागेल, असा विश्वासही सहायक आयुक्त संदीप कृष्णा यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक गायकवाड आणि भाटकर उपस्थित होते. रत्नागिरीतील कोळंबे येथील सावंत असोसिएशन क्रिकेट अरेना या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 22-Nov-2025











