पर्यटन विकास आराखडांतर्गत गणपतीपुळेतील विकासकामे लवकर मार्गी लावण्याची मागणी

गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील पर्यटन विकास आराखडांतर्गत येणारी कामे मार्गी लावण्याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी अनुज जिंदाल यांना निवेदन देण्यात आले आहे, यासाठी गणपतीपुळे हटिल्स अँड टुरिझम असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. या निवेदनात त्यांनी महटले आहे की, गणपतीपुळे परिसर विकास आराखड्यांतर्गत गणपतीपुळे गावातील अनेक महत्त्वाची कामे उत्पूर्ण असल्यामुळे ग्रामस्थ, भक्त व पर्यटक यांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गणपतीपुळे गावातील अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते, गणपतीपुळे गावातील बंद पडलेले पथदीप, बेशिस्त पार्किंगची समस्या, रस्त्यावर गाड्या उभ्या केल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असते. तसेच सांडपाणी व्यवस्थेतील त्रुटी याबरोबरच इतरही अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे गणपतीपुळे पर्यटन विकास आराखडा अध्यक्ष या नात्याने आपण लक्ष घालून संबंधित कामे मार्गी लावावीत, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच शक्य झाल्यास आपण गणपतीपुळे येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यास सध्याच्या परिस्थितीची गांभीर्य लक्षात येईल, असे सांगण्यात आले आहे. या निवेदनाप्रसंगी गणपतीपुळे येथील हॉटेल्स अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद केळकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

गणपतीपुळेतील सर्वच रस्त्यांची स्थिती सध्या अत्यंत दयनीय आहे. तसेच गटारे देखील उघडीच असून, काही ठिकाणी सांडपाणी वारंवार रस्त्यावर येते. त्यामुळे येणाऱ्या अनेक भाविक व पर्यटकांना नाहक त्रासला सामोरे जावे लागते. गणपतीपुळे परिसरातील विकास आराखड्यांतर्गत येणारी कामे अद्याप पूर्ण होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थामधून तीव्र नाराजी आहे. त्यामुळे ही कामे मार्गी लावण्याबाबत आता गणपतीपुळे येथील हॉटेल्स अँड टुरिझम असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. या कारणाने रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालून त्वरित कार्यवाही हाती घेण्याबाबत विकास आराखड्याशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 22-Nov-2025