Gogate -Jogalekar College : गोगटे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद शनिवारी

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे पीएम-उषा अंतर्गत एकदिवसीय बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद वाणिज्य व व्यवस्थापन, लेखाशास्त्र व वित्त आणि अर्थशास्त्र यावरील आंतरराष्ट्रीय परिषद हायब्रीड मोडमध्ये म्हणजेच ऑफलाईन व ऑनलाईन अशा पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.

ही परिषद शनिवारी (ता. २९) सकाळी ९.०० वाजता हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे सुरू होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक दीपक गद्रे यांच्यासह रत्नागिरी एजुकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर आदी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे पीएम उषा यांचीही उपस्थिती लाभणार आहे. परिषदेमध्ये बीजभाषण देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक व वक्ते म्हणून मलेशिया येथील डॉ. अनबिया खैरील तसेच भारतातील डॉ. केतन वीरा यांची उपस्थिती असेल.

ही परिषद संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक विविध क्षेत्रांतील विद्वान तसेच उद्योजक व व्यावसायिकांना नावीन्यपूर्ण कल्पना आणि जागतिक दृष्टिकोनांची देवाणघेवाण करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

या परिषदेमध्ये जगातील विविध देश आणि भारतातील विविध राज्यांमधील तज्ज्ञ संशोधक, विद्वान, उद्योजक व व्यावसायिक, प्राध्यापक व विद्यार्थी असे मिळून एकूण ३५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होणार आहेत.

या परिसंवादात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर परिषदेचे निमंत्रक असून, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, डॉ. रुपेश सावंतदेसाई, डॉ. सीए. अजिंक्य पिलणकर हे सहनिमंत्रक आहेत. या परिषदेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 25/Nov/2025