चिपळूण : आमदार भास्कर जाधव शिवसेनेचे नेते आहेत. ते चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत मशाल या चिन्हाचा प्रचार करतील. शिवसेनेत कुठेही दोन गट नाहीत. काही चुका झाल्या असतील किंवा समन्वय झाला नसेल तर आमचे कार्यकर्ते त्यांना भेटून त्यांचे गैरसमज दूर करतील, अशी माहिती शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी काल चिपळूण येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
राऊत यांनी आज इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल, गोवळकोट रोड येथे भेट देऊन चिपळूण नगरपरिषद निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांनी त्यांना गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणार आहेत. याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, मी या भागाचा माजी खासदार आहे. पक्षाचा नेता आहे. त्यामुळे मी काही सूचना कार्यकत्यांना केल्या आहेत. जाधव हे लवकरच सक्रिय होतील आणि मशालीचा प्रचार करतील, असे राऊत यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पालिका निवडणुकीत जोरदार कामगिरी करण्याचे आवाहन केले. या भेटीदरम्यान उमेदवारांशी तसेच शहर पदाधिकाऱ्यांशी निवडणूक रणनीती, बूथस्तरावरील संघटन, मतदारांशी संवाद आणि शहरातील प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. पक्ष संघटनेने एकजुटीने काम करून जनतेशी संपर्क वाढवावा, असा संदेश राऊत यांनी दिला. यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही उमेदवारांना निवडणूक जनसंपर्क मोहीम आणि संघटन बळकटीकरणाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हा संपर्कप्रमुख नेहा माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन उर्फ भैया कदम उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 25/Nov/2025











