Chiplun Koyna Hydroelectric Project | कोयना वीजप्रकल्पाच्या भुयारातील गळतीच्या कामाला महानिर्मिती देणार २२ कोटी

चिपळूण : कोयना वीजप्रकल्पाच्या अधिजल भुयारातून पाण्याची गळती सुरू आहे. गळती काढण्याचे काम महिन्यात सुरू होईल, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी दिली.

कोयना वीज प्रकल्पाच्या बोगद्यातून पाण्याची गळती होत असल्याने पोफळीच्या पूर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगेतून धबधब्यासारखे पाणी वाहत आहे; मात्र यामुळे वीजप्रकल्पाला कोणताही धोका नाही. गळती काढण्यासाठी मागील सहा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव दीपक मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याला अंतिम मान्यता मिळाली. महानिर्मिती कंपनीने दुरुस्तीच्या कामासाठी २२ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. निविदा प्रक्रिया करून कामाचे आदेशही देण्यात आले, तरीही मागील काही महिने कामाला सुरुवात झालेली नव्हती. पोफळी सर्जवेलची जागा दुर्गम ठिकाणी आहे.

त्या ठिकाणी मशिनरी नेणे सोपे नाही. ही दुरुस्ती केवळ उन्हाळ्यातच करणे शक्य आहे आणि त्यासाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लागेल. यावर्षी पाऊस उशिरापर्यंत होता, तरीही जलसंपदा विभाग आणि महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर अखेर दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. सुमारे ३०० फूट खोल विहिरीत उतरून विहिरीच्या अस्थिकरणाची पाहणी केली. या कामासाठी पुणे येथील एका एजन्सीची मदत घेण्यात आली होती. विहिरीच्या अस्थिकरणाला किती तडे गेले आहेत, हे निश्चित झाल्यामुळे दुरुस्तीच्या कामाचा अंदाज आला आहे. पुढील महिन्याभरात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

कोयना वीजप्रकल्पाच्या अधिजल भुयारातील गळती यावर्षी करणे गरजेचे आहे. आम्ही कामाची प्राथमिक पाहणी केली आहे. दुरुस्तीच्या कामासाठी कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोन बंद ठेवावा लागणार आहे. महानिर्मिती कंपनीशी समन्वय साधून हे काम लवकरच हाती घेतले जाईल- महेश रासनकर, कार्यकारी अभियंता, कोयना जलसंपदा विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 25/Nov/2025