देवरुख : कोकणातली थंडी म्हणजे फक्त गारवा नाही तर सणासुदीचा माहोल असतो. घराघरांत गुलाबी थंडीची चाहूल लागताच ‘पोपटी’ लावण्याची आठवण होते. यानुसार कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात ‘पोपटी’चा आनंद घेताना तरुणाई दिसून येत आहे.
कोकणाच्या मातीतला हा एक अनोखा, गावाकडचा पारंपरिक प्रकार आहे. ज्याची चव जगातल्या कुठल्याही मोठ्या हॉटेलात मिळत नाही असे कोकणवासीय मानतात. थंडीच्या दिवसांत वाल, पावटे यांचे भरघोस उत्पादन असते, बाजारात त्यांचा सुगंध दरवळू लागतो आणि मग गावातल्या अंगणातून धुरकट सकाळी पोपटीचा बेत आखला जातो.
घरातली मडकी बाहेर काढली जातात, केळीची हिरवीगार पानं धुऊन मडक्याच्या आत लावली जातात. तळाशी भांबुर्डी किंवा भामरुटाचा पाला पसरवून जणू निसर्गाचंच अंथरूण तयार केलं जातं. त्यावर एकेक थर घालत ही कोकणी जादू सुरू होते. वालाच्या शेंगा, पावटे, बटाटे, भाज्या, ओव्यासारखा अंगावर येणारा मसाला, हळदीचा सुवास आणि मांसाहार करणाऱ्यांसाठी मासे किंवा चिकनचे तुकडे. हे सगळं थरावर थर रचून मडक्याचं तोंड पुन्हा भांबुर्डीच्या पाल्यानं घट्ट बंद केलं जातं.
अंगणात खड्डा खणला जातो, अंगार पेटवले जातात आणि हे मडकं जणू निसर्गाच्या हळुवार शेकोटीत शिजू लागतं. तास-दीड तासाभरात त्या मडक्यातून उठणारा खमंग सुगंध पसरतो. मग तयार होते ती कोकणातली खास, चटकदार, अंगावर काटा आणणारी पोपटी. पूर्वी हे बेत गावकरी एकत्र येऊन मोकळ्या माळावर किंवा घराच्या अंगणात करायचे. लोक एकत्र बसायचे, गप्पा सुरू होत. पोपटी हा फक्त पदार्थ नाही तर एकत्र येण्याचा उबदारपणा होता. आजही त्याची परंपरा तितकीच जिवंत आहे. सध्या या पोपटीने सगळ्यांनाच भुरळ पडली आणि पाडली आहे. या पोपटीचे आता पोपटी पार्ट्या रूपांतर झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 25/Nov/2025














