“शिक्षिकेची शिस्त आता नगरपालिकेत!”; महायुतीच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांनी मांडली ‘विकासाची ब्ल्यू प्रिंट’, पारदर्शक कारभाराचा घेतला ध्यास

◼️ नगरपालिकेत काम घेऊन जाणाऱ्या ‘कॉमन मॅन’ला मिळणार दिलासा; सुशासन आणि गतिमान कारभाराचे शिल्पा सुर्वे यांचे आश्वासन

➡️ रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी सौ. शिल्पा सुर्वे (Shilpa Surve) या रिंगणात असून, त्यांच्या उमेदवारीमुळे प्रचाराला एक वेगळी सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय दिशा मिळाली आहे. मुळातच एक शिक्षिका असलेल्या शिल्पा सुर्वे यांनी आपल्या प्रचारात केवळ आश्वासने न देता ‘माझी विकासाची ब्ल्यू प्रिंट!’ (My Development Blue Print) लोकांसमोर मांडली आहे. त्यांच्या या पारदर्शक आणि अभ्यासू वृत्तीमुळे रत्नागिरीकरांमधून त्यांना प्रचंड पाठींबा मिळत असल्याचे चित्र आहे.

◼️शिक्षिकेची शिस्त आणि लोकाभिमुख नेतृत्व
शिल्पा सुर्वे यांची ओळख एक शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष शिक्षिका म्हणून आहे. शिक्षकी पेशातील हेच संस्कार त्या आता राजकारणात आणि समाजकारणात रुजवू पाहत आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांच्या कामात असलेली पारदर्शकता आणि जनसामान्यांशी असलेली नाळ, हीच त्यांची जमेची बाजू ठरत आहे.

◼️सर्वसामान्यांची ‘गोची’ थांबवणार
सुशासनाचा संकल्प सध्याच्या सरकारी व्यवस्थेवर भाष्य करताना सुर्वे यांच्या ‘ब्ल्यू प्रिंट’मध्ये प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यात आला आहे. त्या म्हणतात, “कोणत्याही सरकारी कार्यालयात काम घेऊन जायचे म्हटले की, सामान्य माणसाचे पाऊल आपोआप मागे खेचले जाते. सरकारी आस्थापनांचा भोंगळ आणि वेळकाढू कारभार पाहून नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांपासून चार हात लांब राहणेच पसंत करतात.”

◼️’कॉमन मॅन’ची होणारी ही अडचण आणि मानसिक त्रास ओळखून, सुशासन (Good Governance), पारदर्शकता आणि गतिमान कारभाराला चालना देणे, हे शिल्पा सुर्वे यांनी आपल्या अजेंड्यावर प्राधान्याने घेतले आहे.

◼️कशी असेल विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’? नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर कारभार कसा असेल, याचे नियोजन त्यांनी स्पष्ट केले आहे:

◼️गतिमान प्रशासन: सर्वसामान्य नागरिकांची कामे हेलपाटे न मारता, कमीत कमी कालावधीत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.

◼️योजनांची अंमलबजावणी: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवला जाईल.

◼️लोकाभिमुख कारभार: नगर परिषदेचा कारभार केवळ फायलींपुरता मर्यादित न राहता तो लोकाभिमुख आणि विकासाभिमुख केला जाईल.

शिल्पा सुर्वे यांच्या या स्पष्ट आणि थेट भूमिकेमुळे रत्नागिरीतील सुजाण नागरिक, महिला वर्ग आणि तरुणाईचा ओघ महायुतीकडे वळताना दिसत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:31 PM 11/25/2025