Dapoli : रस्त्यांवरील दुतर्फा झाडी वाहनचालकांसाठी संकट

दापोली : तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुतर्फा वाढलेली झाडी सध्या प्रवासी व वाहनचालकांसाठी मोठे संकट ठरत आहे. रस्त्याकडेला वाढलेल्या झाडीझुडुपांमुळे वाहनधारकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे अपघाताची भीती वाढत असून नागरिकांत नाराजी आहे.

नागरिकांनी याबाबत अनेकवेळा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी भावना स्थानिकांमध्ये आहे. आपटी पूल ते साखळोली, गावतळे मार्गावर गंभीर परिस्थिती आहे. या मार्गांवर तर झाडी इतकी वाढली आहे की, रस्त्याची रुंदी कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. रात्रीच्या वेळी या झाडीमुळे दुचाकीस्वारांना धोका अधिक वाढतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पर्यटन मार्गाचीही दुरवस्था
पर्यटकांची कायम वर्दळ असलेल्या पांगारीपन्हाळेकाझी या मार्गावरदेखील मोठ्या प्रमाणात झाडी वाढून रस्ता आच्छादित झाला आहे. पर्यटन हंगामात हा मार्ग सर्वाधिक वापरला जात असताना प्रशासनाचे दुर्लक्ष धोकादायक ठरत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने झाडी छाटणीचे नियोजन करून रस्ते सुरक्षित करावेत, अपघात टाळण्यासाठी योग्य पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

आधीच अरुंद रस्ते त्यात वाढलेली झाडी अपघात कधी होईल हे सांगू शकत नाही. मोठी वाहने समोरासमोर अनेकवेळा थबकतात. त्यामुळे रस्ते दुतर्फा मोकळे होणे गरजेचे आहे- साकीब माखजनकर, टेटवली (दापोली)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 26/Nov/2025