Chiplun : अर्थिंग वायर तुटून शिरगावात दोन तास वीज खंडित

चिपळूण : शिरगाव व एमआयडीसी उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे १५ हजार घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहक व उच्च दाबाचे सुमारे ७५० ग्राहक यांचा वीजपुरवठा २ तास खंडित झाला होता. महावितरण कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासांत वीजपुरवठा पूर्ववत केला.

उपविभाग चिपळूण ग्रामीण येथील पेढांबे परिसरात २० नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता महावितरणच्या २२० केव्ही लाईनवर तांत्रिक बिघाड निर्माण झाला. २२० केव्ही सर्किटच्या टॉवरवरील अर्थिंग वायर तुटून ती थेट ११ केव्ही शिरगाव व कोळकेवाड़ी फिडरवर कोसळली. या घटनेत दोन्ही फिडरचे ११ केव्ही कंडक्टर तुटून पुरवठा बंद झाला. त्यामुळे शिरगाव उपकेंद्राबरोबरच एमआयडीसी उपकेंद्र पूर्णपणे प्रभावित झाले. बिघाड दुरुस्त करणे आव्हानात्मक असतानाही महावितरणच्या पथकाने तत्काळ परिस्थिती हाताळत पर्यायी मार्गांचा वापर करून वीजपुरवठा सुरू केला. ४०० केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ केव्ही शिरगाव फिडरवरून प्रथम एमआयडीसी उपकेंद्र पुन्हा कार्यान्वित करून उपकेंद्रातील फिडर टप्प्याटप्प्याने सुरू केले. पुढे ३३ केव्ही एक्स्प्रेस फिडर पूर्ण क्षमतेने चालू केला. कोळकेवाडी व शिरगाव फिडरवरील काही भागात पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

अवघ्या दोन तासांत म्हणजे रात्री ८.३० वाजता शिरगाव सेक्शनचा संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. या कार्यात शिरगाव व एमआयडीसी सेक्शनच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. घटनास्थळी उपकार्यकारी अभियंता सचिन पाटणकर (चिपळूण), शाखा अभियंते तेजश्री उगारे (शिरगाव) व अमोल मोहिते (धामणंद) यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

संयुक्त प्रयत्नांना यश
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे वीजपुरवठा अल्पावधीतच पूर्ववत करण्यात यश आले. अचानक खंडित झालेला वीजपुरवठा अल्पावधीत सुरळीत झाल्याने परिसरातील नागरिकांसह एमआयडीसीतील ग्राहकांनी महावितरण पथकाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 26/Nov/2025