मंडणगड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समिती मंडणगड तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय मंडणगड आणि वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत तालुक्यात कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. देव्हारे, म्हाप्रळ, कुंबळे, मंडणगड, पालवणी आणि पंदेरी अशा सहा ठिकाणी पाच दिवस चाललेल्या या विशेष उपक्रमात ३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. टाटा हॉस्पिटलचे डॉ. वैभव चंद्रा यांच्यासह सहायक डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ यांनी हे तपासणी शिबिर पार पाडले.
तपासणीत २७० रुग्णांची तोंडाच्या कर्करोगासाठी, १७५ महिलांची स्तन कर्करोगासाठी तसेच १७५ महिलांची गर्भाशय व मुख कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. याशिवाय ४५ जणांची लॅब टेस्टही घेण्यात आली. या उपक्रमासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, गटविकास अधिकारी सुनील खरात, गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे, सहायक प्रशासन अधिकारी मानसी पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी वामन मेंढे, तालुका आरोग्य कार्यालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचारी, पंचायत समिती मंडणगड कार्यालयातील कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 26/Nov/2025














