Sub District Hospital Dapoli | उपजिल्हा रुग्णालयात एक्स-रे विभाग समस्यांच्या विळख्यात

दापोली : कोकणातील प्रमुख आरोग्यकेंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली उपजिल्हा रुग्णालयातील एक्स-रे विभाग अलीकडेच समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. अहवाल मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. मशीन सुरू असूनही अहवाल (रिपोर्ट) तत्काळ न मिळाल्याने उपचार प्रक्रियेवर परिणाम होत आहे.

तालुक्यातील दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांपैकी अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि गरीब कुटुंबातील रुग्ण मोठ्या अपेक्षेने रुग्णालयात पोहोचतात. डॉक्टर तपासणीनंतर एक्स-रेचा सल्ला देतात; मात्र एक्स-रे काढूनही रिपोर्ट मिळेपर्यंत तासनतास प्रतीक्षा करावी लागते. काहींना तर दिवसभर ‘आज रिपोर्ट नाही मिळणार’ असे सांगत परत पाठवल्याची उदाहरणे समोर आली आहेत. परिणामी, अनेक रुग्णांना खासगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत असून, त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचीदेखील हीच व्यथा आहे. हाडांचे विकार, छातीचे आजार किंवा अपघातातील जखमा अशा तातडीच्या केसेसमध्ये एक्स-रे रिपोर्ट हा उपचाराचा मुख्य आधार असतो; मात्र रिपोर्ट वेळेत उपलब्ध होत नसल्याने अचूक निदानात अडथळे निर्माण होत आहेत. रोगनिदान अंधारातच करावे लागत आहे. रुग्णांचे नुकसान होतेय आणि आमच्याही हातावर तुरी देण्यासारखी परिस्थिती आहे, अशी खंत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीदेखील व्यक्त केली.

रुग्ण व नातेवाइकांच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर या विभागात तत्काळ सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची वाढती धावपळ लक्षात घेता एक्स-रे विभाग सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी सर्वसाधारण मागणी होत आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीवर रुग्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावाहून सकाळी लवकर निघून दापोलीत पोहोचतो. डॉक्टरांनी एक्स-रे सांगितला, एक्स-रे काढून देखील झाले; पण रिपोर्टसाठी तासनतास बसून राहायचं. शेवटी उद्या या, असं सांगितलं. आम्हाला रोज येणं शक्य नसतं. शेवटी खासगी ठिकाणी पैसे मोजावे लागत आहेत- कुंदन पवार, रुग्ण, माथेगुजर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 26/Nov/2025