खेड : आगामी खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी खेड पोलिसांकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून खेड शहरातील महानगर परिसरातील एसटी डेपो मैदानात दंगल नियंत्रण पथकाची मॉक ड्रिल घेण्यात आली. या संपूर्ण प्रात्यक्षिकाला उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सनस तसेच खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक अहिरे उपस्थित होते.
निवडणूक काळात संभाव्य गोंधळ, आंदोलने किंवा कायदा-सुव्यवस्थेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तयारी दर्शवली. ड्रिलदरम्यान जवानांनी दंगल नियंत्रणाची विविध प्रक्रिया, जमाव पांगविण्याच्या पद्धती, शिस्तबद्ध हालचाली तसेच तातडीच्या परिस्थितीत कसे प्रतिसाद द्यायचे याचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभागाकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आवश्यक ती सर्व तजवीज करण्यात आली असून, दंगल नियंत्रण पथक पूर्णपणे सज्ज आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. खेड शहरात सुरु असलेल्या निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, मतदारांचा आत्मविश्वास वाढावा आणि कायदा-सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे मॉक ड्रिलमधून स्पष्ट झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 26/Nov/2025














