मंडणगड : आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील शिरगाव येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुचाकी स्कूटर व टँकर यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यातील एकाला प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचाराकरिता अन्यत्र हलवण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या टँकर चालकावर मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पाटमार्गे शिरगाव मंडणगडकडे प्रवास करणाऱ्या दुचाकी ज्युपिटर स्कूटरला (क्र. एमच १२ पी. व्ही ७९०६) मंडणगडमधून शेनाळेकडे जाणाऱ्या पाण्याच्या टँकरने (क्र. केए २८ वी ६३६०) धडक दिल्याने शिरगाव पाट फाटा येथे हा अपघात घडला.
या अपघातात दुचाकी चालक तन्मय सतेंद्र देव (२८) रा. सेवालाल नगर मंडणगड व त्यांच्या सोबत असलेले प्रेमळ पांडुरंग भोजने (वय ४३) राहणार तुळशी या दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील प्रेमळ भोजने यांना अधिक उपचाराकरिता पुढे हलवण्यात आले. बेदरकारपणे व चुकीच्या दिशेने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टैंकर चालक सुनील कुमार बलदेवराज यादव (४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 27/Nov/2025














