चिपळूण : चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह विविध प्रभागातून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या सुमारे २० उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप झाले. नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गात असल्यामुळे या वेळेस अपक्ष उमेदवारांसह सर्वच पक्षातील युती, आघाडी व स्वतंत्र निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या ७ आहे. त्यामध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त दोन उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न.प. निवडणूक रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांसाठी चिन्हांचे वाटप झाले. त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन अपक्ष तर नगरसेवक पदासाठी १८ अपक्षांना चिन्हे वाटप करण्यात आली तर उर्वरित नगराध्यक्ष पदासाठी त्या-त्या पक्षाकडून अधिकृत असलेल्या उमेदवारांची चिन्हे तसेच नगरसेवक पदासाठी त्या-त्या पक्षाकडून अधिकृत असलेल्या उमेदवारांची चिन्हे नामनिर्दिष्ट करण्यात आली.
चिन्ह वाटपामध्ये अपक्षांकडून सर्वात जास्त कपबशी या चिन्हाला पसंती मिळाली. एकूण तीन अपक्षांनी कपबशी चिन्ह पसंत केले. त्या खालोखाल अंगठी, नारळ, रिक्षा, गॅस सिलिंडर या चिन्हाला प्रत्येकी दोन-दोन अपक्षांकडून पसंती मिळाली तर संगणक, छत्री, बॅट, पुस्तक, शिट्टी, फुगा, बस, फूटबॉल आदी चिन्हांना प्रत्येकी एक-एक अपक्ष उमेदवाराने पसंती दिली. एकूणच रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांचे चिन्ह मतदारांवर किती छाप उमटविते त्यावर रिंगणातील उमेदवारांच्या विजयाचे भवितव्य ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 27/Nov/2025














