चिपळूण पूर रेषेचा प्रश्न मार्गी लावणार; उमेश सकपाळ यांच्याकडून ग्वाही

चिपळूण : लाल व निळी पूररेषा शहर विकासाला मारत ठरत आहे. ही पुररेषा हटवतानाच मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने खाडीतील गाळ काढणे आणि सरकारच्या माध्यमातून वाशिष्ठी नदी गाळमुक्त करून शहराला पूरमुक्त करू, अशी ग्वाही महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेश सकपाळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील संपर्क कार्यालयात उमेश सकपाळ यांनी पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रसिद्ध केला. ते म्हणाले, सध्या पालिकेच्या इमारतीची दयनीय अवस्था आहे. आगामी काळात देखणी, अत्याधुनिक इमारत उभारली जाईल. शहरातील प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीट केले जातील.

चिंचनाका-पॉवर हाऊस रस्त्याचे रुंदीकरण करण्याला प्राधान्य असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा ओळखून पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत घरपोच औषधे पोहोचवण्याची योजना राबवली जाईल. जर हे काम पालिकेमार्फत शक्य झाले नाही, तर मी वैयक्तिक पातळीवर हे काम करीन. शहरातील गृहिणींना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचा मानसही त्यांनी मांडला.

कला, साहित्य आणि आरोग्य क्षेत्रात काम करत असल्याचा उल्लेख करून, क्रीडा क्षेत्रासाठीही मोठे नियोजन त्यांनी समोर ठेवले. पवन तलाव, उक्ताड येथील मैदान आणि अन्य जागा विकसित करून राष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट सामन्यांची निर्मिती करण्याचा मानस आहे. घरगुती गॅस लाईनचे काम पूर्ण झाल्यास १५०० रुपयांच्या सिलेंडरच्या ऐवजी महिन्याला केवळ ३०० रुपये खर्च येईल. आमदार शेखर निकम यांच्या पाठिंब्याबाबत ते म्हणाले, शेखर सरांशी चर्चा झाली आहे. ते माझ्यासोबत आहेत. जागा वाटपावरून सुरुवातीला गैरसमज झाले असतील, परंतु आता महायुतीत सर्व ठीक आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव आणि अन्य पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाले आहेत.

शहरातील युवती, महिला, विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही क्षणी अडचण, धोक्याची परिस्थिती किंवा तातडीची गरज निर्माण झाल्यास, २४ तास कार्यरत विशेष हेल्पलाइन माझ्या कार्यालयातून सुरू केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून चिपळूणसाठी मोठा निधी मिळवण्याचा प्रयत्न असेल. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असल्याने निधीची कमतरता भासणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 27/Nov/2025