E-Charging Station : रत्नागिरी आगारातील चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यावर

रत्नागिरी : रत्नागिरी आगारातील चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यावर असून दोन महिन्यांत चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होईल. एकूण ३५ बसेस रत्नागिरी आगारात येणार असून पहिल्या टप्प्यात १० ई-बसेस येतील. नव्या वर्षात रत्नागिरी शहरात ई-बसेस धावतील, अशा पद्धतीने काम सुरू असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी बोलताना मंगळवारी दिली.

वाढत्या इंधन दरवाढीमुळे आता एसटी महामंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक ई-बसेस, सीएनजी बसेस सुरू करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर चिपळुणामध्ये सीएनजी बसेसची सुरूवात झाली आहे. तर दापोलीमध्ये चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यात ई-बसेस प्रत्यक्षात रस्त्यावर धावू लागल्या आहेत. रत्नागिरीसह इतर ठिकाणी ई-बसेससाठीचे चार्जिंग स्टेशनचे काम सुरू आहे.

पावसाळ्यात कामाची गती मंदावली होती. मात्र आता कामास वेग आला असून येत्या दोन महिन्यांत रत्नागिरी शहरातील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होईल. जानेवारी महिन्यात रत्नागिरी शहरात प्रत्यक्षात ई-बसेस रस्त्यावर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या बसेसमध्ये प्रवास करण्यास मिळणार आहे.

या ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन
रत्नागिरी शहर, चिपळूण, खेड, दापोली या चार ठिकाणी चार्जिंग स्टेशन होणार आहे. त्यापैकी दापोलीमध्ये चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात ३० ई-बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहे. उर्वरित रत्नागिरी, खेड आणि चिपळुणचे काम वेगाने सुरू असून लवकरच काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 27/Nov/2025