करजुवे : येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता एका व्यक्तीने दारूच्या नशेत वाळूने भरलेल्या डंपरच्या चालकाला पिस्तूलाचा धाक दाखवून वाहनाची चावी काढून घेण्याचा आणि धमकी देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी तक्रारदाराने त्याच दिवशी सायंकाळी ६.०५ वाजता माखजन दूरक्षेत्रात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हर्षद एकनाथ साळुंखे (व्यवसाय चालक) हे एम. एच. ०८ / ए.पी. ६५३४ या क्रमांकाच्या डंपरमध्ये करजुवे येथून वाळू भरून करजुवे ते माखजन रस्त्याने कडवई येथे जात होते. याचवेळी करजुवे गावामध्ये सुरज उदय नलावडे हा व्यक्ती डंपरजवळ आला आणि त्याने साळुंखे यांच्याकडे डंपरची चावी मागितली. साळुंखे यांनी ‘कशाला पाहिजे’ म्हणून चावी देण्यास नकार दिल्यावर नलावडे याला राग आला. दारूच्या नशेत असलेल्या सुरज नलावडे याने त्वरित त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर (Swift Dzire) गाडी डंपरसमोर आडवी लावली. त्यानंतर त्याने गाडीतून सिंगल हँडची काडतूस बंदूक घेऊन खाली उतरत डंपरचा दरवाजा उघडला. त्याने जबरदस्तीने डंपरची चावी काढून घेतली. इतकेच नव्हे तर, नलावडे याने हर्षद साळुंखे यांच्या मालकाला शिवीगाळ करत ‘घरातून चावी घेऊन जायला सांग’ अशी गंभीर धमकी दिली.
हर्षद साळुंखे यांनी तातडीने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०५ वाजता माखजन पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, आकरन्स नंबर ६१ / २०२५ वरून सुरज उदय नलावडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 27/Nov/2025














