चिपळूण : निवडणुकांमध्ये जात व धर्माचा उघडपणे वापर करून मत मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून, या प्रवृत्तीमुळे नीतिमत्ता उरली नसल्याची खंत वाटते, असे टीकास्त्र आमदार भास्कर जाधव यांनी सोडले. शिरळ ग्रामपंचायत व जि.प. यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने उभारण्यात येणाऱ्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजन व अंगणवाडी उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
आ. जाधव पुढे म्हणाले, आपण जात किंवा धर्माचा द्वेष केला नाही आणि माझ्या उमेदवारासाठी कधीही जातीच्या नावाने मत मागितले नाही. माझी एकमेव ओळख म्हणजे विकास. गेल्या ७५ वर्षांत काँग्रेसच्या काळात राज्यकर्त्यांनी जातपात कमी करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने आपली जात घरापुरती ठेवावी, रस्त्यावर आणि राजकारणात आणू नये. परंतु गेल्या ११ वर्षांत जातीयतेचे पुन्हा डोके वर काढण्याचे वातावरण देशात निर्माण झाले आहे.
आज प्रत्येक निवडणुकीत जात व धर्माचा आधार घेतला जातो. अगदी विकास कामांमध्येही जात व पक्ष बघून निर्णय घेतले जातात, ही चिंतेची बाब आहे. निवडणुकांच्या वेळी मोठमोठी आश्वासने दिली जातात; परंतु निकालानंतर अनेक उमेदवार गायब होतात. काही मात्र त्या संधीचे सोने करतात. जिंकणार हरणार कोणीही, पण लोकांची कामे सातत्याने करणे हेच खऱ्या कार्यकर्त्याचे लक्षण आहे, असे त्यांनी सांगितले.
निवडणुका आल्या की खोटी पत्रके वाटली जातात, खोटी आश्वासने दिली जातात. त्यामुळे लोकांनी सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे, असा कानमंत्रही आ. जाधव यांनी उपस्थितांना दिला. यावेळी सरपंच शशिकांत राऊत, माजी जि. प. सदस्य मिनल काणेकर, महालक्ष्मी-साळूबाई देवस्थानचे अध्यक्ष कमलाकर आंब्रे, ग्रा. पं. सदस्य फैय्याज शिरळकर, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव, खरवते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली मयेकर, शिवसेना खाडीपट्टा विभागप्रमुख नितीन निकम, उपसरपंच शमीमबानू चिपळूणकर, संगिता मोरे, सुलताना चौघुले, संजना भुवड, ग्रामसेविका सुप्रिया कदम, रेहेळ-भागाडीचे उपसरपंच रूपेश शेलार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शौकत म्हातारनाईक, माजी अध्यक्ष दिलावर काद्री, मुदस्सर चौगुले, प्रशांत राऊत, अजित राऊत, पोलीस पाटील दिलावर खङपोलकर, विभागप्रमुख मिलिंद शिर्के, आरोग्य सेवक विनोद जाधव, आरोग्य सेविका शमिका सावंत, आशा सेविका स्नेहा मोरे, विकास मोरे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 27/Nov/2025














