रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे पीएम-उषाअंतर्गत येत्या शनिवारी (ता. २९) एकदिवसीय बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. वाणिज्य व व्यवस्थापन, वित्त आणि अर्थशास्त्र यांवरील जागतिक संवाद या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योगपती दीपक गद्रे यांच्या हस्ते सकाळी ९ वा. हॉटेल विवा येथे होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर तसेच पीएम उषा समन्वयक डॉ. पांडुरंग बर्कले उपस्थिती लाभणार आहेत. परिषदेमध्ये बीजभाषण देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक व वक्ते म्हणून मलेशिया येथील डॉ. अनबिया खैरील, भारतातील डॉ. केतन वीरा उपस्थित राहतील. ही परिषद ऑफलाईन व ऑनलाईन अशी हायब्रिड स्वरूपात होणार आहे.
परिषदेमध्ये जगातील विविध देश आणि भारतातील संशोधक, विद्वान, उद्योजक व व्यावसायिक, प्राध्यापक व विद्यार्थी अशा ३५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे एकूण ८० पेक्षा जास्त विविध विषयांवरील शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. परिषदेचे निमंत्रक प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व सहनिमंत्रक वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, डॉ. रूपेश सावंतदेसाई, डॉ. सीए अजिंक्य पिलणकर आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 28/Nov/2025














