Dapoli : मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतागृहाची अवस्था धोकादायक

दापोली : तालुक्यातील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर सुमारे दहा-अकरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले स्वच्छतागृह आज अक्षरशः मृत्यूला आमंत्रण ठरत आहे. उद्घाटना आधीच हे बांधकाम दर्जाहीन ठरल्यामुळे कधीही वापरात आले नाही. परिणामी वर्षानुवर्षे वाऱ्यावर सोडलेल्या या इमारतीचे काँक्रीट निखळू लागले असून ती कोसळण्याच्या स्थितीत आहे.

दोन वर्षांपूर्वी समुद्राच्या प्रचंड लाटांनी चेंजींग रूमचे संपूर्ण बांधकाम समुद्रात विलीन केले. मात्र मुख्य स्वच्छतागृह अजूनही उभे असले तरी त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. या ठिकाणी धोक्याची पाटी, संरक्षक कुंपण अथवा पर्यटकांना सावध करणारी कोणतीही सुविधा नाही. परिणामी अनभिज्ञ पर्यटक या ढासळलेल्या भिंतीवर बसताना दिसतात आणि मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या स्वच्छतागृहासाठी खर्च करण्यात आलेला सरकारी निधी पाण्यात गेल्याची प्रत्यक्ष उदाहरणे येथे पाहायला मिळतात. बांधकाम अद्याप ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाले नसल्याने संबंधित बांधकाम विभागाकडूनही पाडकामाची कोणतीही हालचाल नाही. प्रशासनाच्या या निष्क्रीय भूमिकेबद्दल स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 28/Nov/2025