चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील गॅबियन वॉलचे काम पावसाळ्यात रखडले होते. ते नुकतेच सुरू झाले आहे. गॅबियन वॉलच्या दुरुस्तीसह उर्वरित कामेही करण्यात येणार आहेत. जानेवारी अखेरपर्यंत हे काम मार्गी लागेल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम सतत विविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहिले आहे. सुरुवातीला कुळ, खोत व देवस्थानच्या मोबदल्यावरून परशुराम घाट चर्चेत होता. त्यानंतर घाटाच्या डोंगरमाथ्यावर व पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीचा सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला. पावसाळ्यापूर्वी घाटातील अतिशय धोकादायक ठिकाणी काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले होते, तर काही ठिकाणी रस्ताही खचला. तिथे सुरक्षित उपाययोजनांसाठी ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू होते; मात्र पावसाळ्यात अचानक रस्त्याचा मोठा भाग खचला आणि संरक्षक भिंतही कोसळली. तेव्हापासून परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी गॅबियन वॉल उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून घेण्यात आला; मात्र मे महिन्यातील पहिल्याच पावसात नव्याने उभारलेली गॅबियन वॉलही खचली. त्यानंतर काही दिवसातच या वॉलचा काही भाग भरावासह वाहून गेल्याने या मार्गावरील धोका आणखीच वाढला. त्यामुळे पुन्हा येथून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. पावसाळा संपल्यानंतर गेल्या आठवड्यापासून परशुराम घाटातील गॅबियन वॉलच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रणा तैनात केल्यामुळे भिंतीचे काम वेगाने सुरू आहे. पावसाळ्यात खचलेल्या भागाचीही आता दुरुस्ती केली जात आहे, तर गॅबियन वॉलचे उर्वरित कामही पूर्ण केले जाणार आहे. १५ जानेवारीअखेर वॉलचे काम मार्गी लागेल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पावसाळ्यात परशुराम घाटातील गॅबियन वॉल खचली होती; मात्र आता या भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दुरुस्तीसह वॉलचे शिल्लक कामही जानेवारीअखेर पूर्ण केले जाणार आहे-पंकज गोसावी, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग
डोंगरावर लोखंडी जाळ्या
परशुराम घाटातील दरडीचा भाग कोसळू नये, म्हणून डोंगरावर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात डोंगरावरून खाली भराव येण्याच्या प्रकाराला काही अंशी आळा बसला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 28/Nov/2025














