राजापूर : २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास राजापूर तालुक्यातील कारवली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शकुंतला किरण चव्हाण या कारवली येथे राहणाऱ्या महिलेची दीड वर्षाची मुलगी संस्कृती किरण चव्हाण ही वडाप गाडीच्या धडकेत गंभीर जखमी झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शकुंतला चव्हाण या पाचल बाजार करून कारवली रस्त्यावर वडाप गाडीतून उतरत असताना आणि पैसे देत असताना, त्यांची मुलगी संस्कृती चव्हाण रस्त्यावर उभी होती. त्याच वेळी, वडाप गाडी चालकाने अचानक गाडी रिव्हर्स (मागे) घेतली, त्यामुळे संस्कृती खाली पडली आणि गाडीचे एक चाक तिच्या पोटावरून गेले.
अपघात घडताच शकुंतला चव्हाण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मुलीला तातडीने कारवली पाचल ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, पुढील आणि अधिक उपचारासाठी तिला १०८ अॅम्बुलन्सच्या मदतीने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, जिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेची तक्रार दुसऱ्या दिवशी, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजून १९ मिनिटांनी राजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. राजापूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 28/Nov/2025














