Ratnagiri : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘म्युझियम ऑन व्हील्स’ उपक्रम उत्साहात

रत्नागिरी : ‘म्युझियम ऑन व्हील्स’ हा आगळावेगळा उपक्रम शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या फिरत्या संग्रहालयाने विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची रोमांचक दुनिया प्रत्यक्ष अनुभवण्याची दुर्मीळ संधी दिली.

शहरातील जवाहर क्रीडांगणावर उभारलेल्या या विशेष बसमध्ये सिंधूसरस्वती संस्कृतीचे आकर्षक, माहितीपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरण पाहण्यासाठी दिवसभरात तब्बल १९०० हून अधिक विद्यार्थी आणि सुमारे १०० शिक्षक उत्साहाने दाखल झाले. जीजीपीएस शाळा, कै. बाबुराव जोशी गुरुकुल, नानल गुरुकुल, रा. भा. शिर्के प्रशाला, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांसोबतच कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील अन्य विषयांच्या विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या प्रदर्शनात जगातील आद्य नागरी संस्कृतींपैकी एक असलेल्या सिधूसरस्वती संस्कृतीची नेटकी नगररचना, प्रगत शेतीप्रणाली, व्यापारजाळे, हस्तकला, चलनमुद्रा आदी विविध पैलूंचे जिवंत दर्शन अत्यंत आकर्षक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादर करण्यात आले. उत्खननातील पुरावशेषांच्या प्रतिकृती, नकाशे, चलतचित्रे आणि मॉडेल्स पाहताना विद्यार्थ्यांनी वारंवार आश्चर्य व्यक्त केले. शिवाय, आजवर फक्त पुस्तकांत पाहिलेल्या काही वस्तू, सोंगट्या आणि खेळणी प्रत्यक्ष हाताळता आल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह आणखीनच वाढला. प्राचीन संस्कृतीच्या अनुभवाची ही संधी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली. या उपक्रमाचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांच्याहस्ते झाले.

इतिहासाचे जिवंत दर्शन घेण्याचा आनंददायी अनुभव आपल्याला या संग्रहालयातील विविध वस्तूंच्या माध्यमांतून मिळणार आहे. ही अनोखी संधी शाळेच्या तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच साधावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या फिरत्या संग्रहालयाला भेट देताना केले. या उपक्रमासाठी स्वयंसेवक म्हणून निशिता मनोज पवार (प्रथम वर्ष कला), कीर्ती संतोष जोगळेकर (प्रथम वर्ष कला), अथर्व सचिन पवार (द्वितीय वर्ष कला), प्रणव किरण पाध्ये (द्वितीय वर्ष कला), सिद्धी सुरेश मांजरेकर (द्वितीय वर्ष कला), प्रेरणा नरेश शिंदे (द्वितीय वर्ष कला), जान्हवी सचिन जोशी (तृतीय वर्ष कला), ओंकार मंदार आठवले (तृतीय वर्ष कला) या विद्याथ्यांनी काम केले.

नियोजन इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे व अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे शिक्षक निनाद तेंडुलकर यांनी केले. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, सचिन सनगरे, संयुक्ता शेट्ये, डॉ. विनोद शिंदे यांचे पाठबळ लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 28/Nov/2025