रत्नागिरी : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडळ अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील १ लाख ७२ हजार १८१ ग्राहकांकडे ३७ कोटी ५१ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. वीज बिल थकवणाऱ्या रत्नागिरी परिमंडलातील ३ हजार २१ वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे.
रत्नागिरी थकबाकीदारांमध्ये जिल्ह्यातील १ हजार ७४९ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ हजार २७२ ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकित बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी परिमंडल अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती १ लाख ४९ हजार २२८ ग्राहकांकडे २२ कोटी ९२ लाख, व्यावसायिक १४ हजार ८५२ ग्राहकांकडे ७ कोटी ६२ लाख, औद्योगिक २ हजार १७६ ग्राहकांकडे ३ कोटी ९३ लाख, सार्वजनिक सेवा वर्गवारीतील ५ हजार ५३३ ग्राहकांकडे २ कोटी ६९ लाख आणि इतर वर्गवारीतील ३९२ ग्राहकांकडे ३४ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक,
औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर विभागात एकूण ४४ हजार ३३० ग्राहकांकडे ८ कोटी ७९ लाख, खेड विभागात २७हजार १४३ ग्राहकांकडे ५ कोटी २ लाख, चिपळूण विभागात २४ हजार ७२८ ग्राहकांकडे ४ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात ३६ हजार ७८६ ग्राहकांकडे ८ कोटी ८२ लाख, कुडाळ विभागात ३९ हजार १९४ ग्राहकांकडे १० कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजग्राहकांना महावितरणच्या या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने वीजबिलाचा भरणा करता येतो. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध असल्याचे महावितरणने कळविले आहे.
ऑनलाईन बील भरणाऱ्यांना सूट !
डिजिटल पर्याय वापरुन वीज बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना देय रकमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 29/Nov/2025














