दापोलीत धावणाऱ्या ‘लाल परी’च्या धुरामुळे वाहनचालकांचा कोंडतोय श्वास !

दापोली : दापोली ते हर्णे हा कोकणातील महत्त्वाचा पर्यटन मार्ग असून, येथे धावणाऱ्या एका एसटी बसमधून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे मागून जाणाऱ्या वाहनचालकांचे अक्षरशः श्वास रोखले जात असल्याचे समोर आले आहे.

अलीकडेच या बसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये बसच्या सायलेन्सरमधून निळसर-काळा दाट धूर बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्ते या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. “सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त असायला हवी. पर्यावरणाची हानी आणि नागरिकांच्या जीवाशी असा खेळ खपवून घेतला जाणार नाही” असे सामाजिक कार्यकर्ते सलीम रखांगे यांनी सांगितले.

कोकणातील पर्यटकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा असून, अशा प्रदूषण करणाऱ्या वाहनांची तत्काळ तपासणी करणे आवश्यक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 29/Nov/2025