Chiplun: चिपळूणमध्ये उद्या दुसरी हाफ मॅरेथॉन स्पर्धा

रत्नागिरी : चिपळूण येथील संघर्ष क्रीडा मंडळ आयोजित दुसरी चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धा येत्या रविवारी, दि. ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेला राज्यातील आणि बाहेरील धावपटूंकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण १८९५ धावपटूंनी नोंदणी केली आहे.

छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली आणि पंजाब या राज्यांतील ३० धावपटू स्पर्धेत सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सातारा, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली, अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि नंदुरबार या जिल्ह्यांतून ३९० धावपटू, तर रत्नागिरी जिल्ह्यातील १५८४ धावपटू या स्पर्धेत भाग घेत आहेत. २१ आणि १० किमी शर्यतींसाठी सुमारे ५०० स्पर्धक, तर शालेय ५ किमी गटासाठी सुमारे १२०० विद्यार्थी सहभागी होत आहेत. स्थानिकांना प्रोत्साहन म्हणून ५ किमीचा स्वतंत्र गट केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेला चिपळूण नगरपालिकेच मोलाचे सहकार्य लाभले आहे. हाफ मॅरेथॉन विजेत्या पुरुष व महिला स्पर्धकांसाठी अनुक्रमे ५१ हजारांचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. विविध गटांतील विजेत्यांसाठी एकूण ११४ रोख बक्षिसे देण्यात येणार असून त्यांची एकत्रित रक्कम ६ लाख ५२ हजार आहे. सर्व सहभागी धावपटूंना टी-शर्ट, आकर्षक बॅग, फिनिशर मेडल, ई-प्रमाणपत्र तसेच न्याहारी देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी एअर मार्शल हेमंत भागवत, प्रसाद देवस्थळी (रत्नागिरी) आणि संध्या दाभोळकर यांची ब्रँड अॅम्बॅसॅडर म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. मनीषा वाघमारे स्पर्धेच्या कॅप्टनची भूमिका पार पाडणार आहेत. २१ आणि १० किमी शर्यतींसाठी खुल्या गटासह ३१-४०, ४१-५०, ५१-६० आणि ६० वर्षांवरील असे विभाग ठेवण्यात आले आहेत. शालेय गटात १४ वर्षांखालील, १५ वर्षे, १६ वर्षे आणि १७ वर्षे असे गट असून प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.या स्पर्धेसाठी मूळचे देवधामापूरचे रहिवासी आणि सोलापूर येथील येस इंटरप्राइजेसचेचे मालक सुनील केशव सप्रे यांनी आपले काका काकू, चिपळूण येथील उद्योजक कै. प्रकाश सप्रे आणि कै. गीता सप्रे यांच्या स्मरणार्थ पुरुष खुला गट आणि महिला खुला गट यातील विजेत्याला प्रत्येकी ५१००० रुपयांचे पारितोषिक देऊ केले आहे.

Radhakrushna patapedhi

यावर्षीची स्पर्धा “धावू प्लास्टिक कचरामुक्तीसाठी” या पर्यावरणपूरक थीमवर आधारित आहे. थीम पार्टनर म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्था कार्यरत असून ही संस्था १९९२ पासून पर्यावरण संवर्धनासाठी काम करत आहे. मागील पाच वर्षांत संस्थेने २५० टन प्लास्टिक संकलित करून पुनर्वापरासाठी पाठवले आहे. स्पर्धकांनी बीब घेताना १०० ग्रॅम स्वच्छ प्लास्टिक जमा करण्याचे आवाहन करण्यात आले असून या उपक्रमातून सहभागींच्या लकी ड्रॉमध्ये विजेत्यास स्मार्ट वॉच देण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मात्र त्यांनी प्रत्येकी २ किलो स्वच्छ, सुके प्लास्टिक आपल्या शाळेत जमा करणे आवश्यक आहे.या स्पर्धेत पहिल्यांदाच “व्हर्च्युअल रन” गट ठेवण्यात आला असून देशातील कोणत्याही ठिकाणाहून धावण्याची सुविधा यंदा उपलब्ध झाली आहे. या गटात ३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून त्यांना फिनिशर मेडल आणि ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 29-11-2025