Ratnagiri : कळझोंडी रस्त्यावर जीव मुठीत घेऊन प्रवास

रत्नागिरी : तालुक्यातील कळझोंडी गावातील रस्त्यांत भले मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालक व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कळझोंडी क्रमांक १ ते कळझोंडी क्रमांक २ या मार्गावरून सातत्याने एसटी वाहतूक व इतर रिक्षा, दुचाकी, ट्रक यांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरून शालेय विद्यार्थी, आजारी व्यक्ती, कर्मचारी, उद्योजक यांची दैनंदिन रेलचेल सुरू असते.

कळझोंडी क्रमांक २ ते तिसंग मार्ग या रस्त्यावर प्रचंड खड्डे व साईट पट्टी पूर्णपणे बाद झाल्याने या भागातील छोट्या-छोट्या वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर कळझोंडी तिसंग ते धरण मार्गे हा रस्ता ही नदीच्या व धरणाच्या पाण्याने बराचसा खचला असून या रस्त्यावर भेगा पडल्या आहेत.

धरणाच्या बाजूला प्रचंड पाण्याचा साठा असून एखादे वाहन घसरले, तर पाण्यातच मोठा अपघात होऊ शकतो. या रस्त्याला संरक्षण भिंत ही नाही. यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामपंचायत कळझोंडी यांच्या वतीने ग्रामसभेत विविध ठराव करण्यात आले आहेत. पत्रव्यवहार, अर्ज, विनंत्या संबंधित खात्यांना करण्यात आल्या असून ही संबंधित खात्यांकडून कोणती ही हालचाल केली नाही. अखेर ग्रामपंचायतीने हात टेकले असून, आता शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता कळझोंडी फाटा क्रमांक २ (निवडी जयगड रोड) येथे कळझोंडी ग्रामस्थांकडून ‘धरणे आंदोलन’ उभे केले जाणार आहे.

याबाबत कळझोंडी ग्रामपंचायतच्या सरपंच दीप्ती वीर, उपसरपंच प्रकाश पवार, ग्रामसेवक अमोल केदारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, महिला यांना याबाबत माहिती देण्यात आली असून, भव्य जनआंदोलन उभारणीच्या कामासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावात आता पासूनच जनजागृती करण्यासाठी ग्रामस्थ महादेव आग्रे, संदीप पवार, पांडुरंग सनगरे, के. आर. पवार, आदींच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारीला लागले असून, या जन आंदोलनाची निवेदने जिल्हाधिकारी, रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी त्यांना १ डिसेंबर रोजी देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थ महादेव आग्रे यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 29/Nov/2025