Ratnagiri : कुष्ठरोगमुक्त शोध मोहिमेतील एक्स-रे तपासणीत जिल्ह्यात १३१ पॉझिटिव्ह

रत्नागिरी : कुष्ठरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या शोधमोहिमेत आरोग्य विभागाकडून २ लाख ३६ हजार ४९४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील २४ हजार ४५४ लोकांची एक्स-रे तपासणी केली. त्यामध्ये १३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आरोग्य विभागाकडून कुष्ठरुग्ण शोध अभियान जिल्ह्यात सर्वत्र राबवले जात आहे. ६५ आरोग्यकेंद्रे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये जनजागृतीसाठी प्रभातफेरी व रांगोळी स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्यामधून तपासणीसाठी आवाहन केले जात आहे. लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. या अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील पावस प्राथमिक आरोग्यकेंद्र व गोळप उपकेंद्राच्यावतीने वायंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जनजागृती उपक्रम राबवले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे व डॉ. अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसह पालकही सहभागी झाले होते. वायंगणी गावात प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन कुष्ठरोगाबाबत जागृतीपर संदेश दिले. रांगोळी स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची कारणे, लक्षणे, निदान व उपचारपद्धती यावर माहित माहिती दिली. तसेच टीबीमुक्त भारत अभियान, जलजन्य आजार, कीटकजन्य आजारांपासून बचाव याविषयी आरोग्यशिक्षणही देण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्यातील कुष्ठरोग शोधमोहिमेचा आढावा आरोग्य विभागाकडून देण्यात आला. त्यामध्ये तपासणी करणाऱ्यांची संख्या सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात एक्स-रे तपासणी केलेल्या २४ हजार ४५४ लोकांपैकी १३१ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी आवाहन करत लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधून त्यांची तपासणी करून घ्यावी, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 29/Nov/2025