लांजा : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या रविवार दिनांक ३० डिसेंबर रोजी लांजा दौऱ्यावर येत आहेत. लांजा रेस्ट हाऊस या ठिकाणी दुपारी बारा वाजता त्यांची प्रचार सभा होणार आहे.
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच तापला असून शिवसेना भाजपा महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या सावली सुनील कुरूप तसेच महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी लांजा दौऱ्यावर येत असून त्यांची जाहीर महासभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे.
लांजा रेस्ट हाऊस येथील पटांगणावर ही जाहीर महासभा दुपारी बारा वाजता होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन हे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित आणि जिल्हा संघटक विलास चाळके हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, प्रचार सभेचे निमित्ताने लांजा दौऱ्यावर येणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यामुळे लांजातील महायुतीच्या उमेदवारांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून या सभेच्या यशस्वीतेसाठी शिवसेना भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 29/Nov/2025














